टेंभूर्णीत पैलवानाकडून गावठी पिस्टल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने टेंभूर्णी येथे छापा टाकत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका पैलवानास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी अभिषेक उर्फ भैय्या गायकवाड (वय २८, रा. बेंबळे, ता. माढा) असा आहे. टेंभूर्णी शहरातील एका परमिट रूममध्ये तो अवैध अग्निशस्त्रासह बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक म. इसाक अबास मुजावर यांच्या पथकाने तात्काळ छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून मॅगझीनसह गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता २० मार्च २०२६ पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.