पोलीस उपायुक्त परिमंडळ-८ मध्ये गुन्ह्यांतील हस्तगत मालमत्ता मूळ मालकांना परत
मुंबई – पोलीस उपायुक्त परिमंडळ – ८ मधील बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ या ७ पोलीस ठाण्यांमार्फत गुन्ह्यांमध्ये हस्तगत झालेली मालमत्ता मूळ मालकांना परत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सोनसाखळी चोरी, जबरी चोरी आणि मालमत्ता संबंधित गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले मोबाईल, मौल्यवान दागिने, मोटार वाहने आणि रोख रक्कम असा एकूण ६८,३८,६३५/- रुपये किंमतीचा ऐवज मूळ मालकांना परत करण्यात आला. यासोबतच सायबर गुन्ह्यांमध्ये हस्तगत झालेली १८,२४,०००/- रुपये ची रक्कमही परत करण्यात आली. एकूण ८६,६२,६३५/-रुपये किंमतीची मालमत्ता ८९ मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आली.
हा सोहळा पसायदान हॉल, बीकेसी पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर पार पडला. परिमंडळ-८ चे पोलीस उप आयुक्त श्री. मनीष कलवानिया यांच्या हस्ते सदर मालमत्ता मूळ मालकांना परत करण्यात आली. सदर कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त, खेरवाडी विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त, विमानतळ विभाग तसेच संबंधित सात पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.