अनैतिक संबंध अन् ब्लॅकमेलिंगला कंटाळून ड्रायव्हरनेच केली मनिषा बिडवेची हत्या

Spread the love

अनैतिक संबंध अन् ब्लॅकमेलिंगला कंटाळून ड्रायव्हरनेच केली मनिषा बिडवेची हत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

धाराशिव – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप होत असलेल्या कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे या महिलेची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राहत्या घरात मनीषा बिडवेचा मृतदेह आढळल्याने या हत्येचे गूढ वाढले होते. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली असून अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगमुळे मनीषा बिडवेचा निर्घृण खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रामेश्वर भोसले असे मुख्य आरोपीचे नाव असून उस्मान गुलाब सय्यद असे हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर पोलिसांच्या चौकशीत या हत्येमागचे हादरवुन टाकणारे कारण समोर आले असून ड्रायव्हरशी असलेल्या अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा कारभारी बिडवे ही महिला कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीत ती एकटी राहत होती. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे महिलेचे जन्मगाव आहे. तर बीड जिल्ह्यातील आडस हे महिलेचे माहेर होते. मुख्य आरोपी रामेश्वर भोसले हा महिलेकडे चालक म्हणून काम करत होता. याकाळात रामेश्वर भोसले आणि मनिषा बिडवे यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. याचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मनिषा कारभारीने काढले होते. हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून ती आरोपीला ब्लॅकमेल करत होती. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आरोपीने मनिषा बिडवेची हत्या करण्याचे ठरवले. २२ मार्च रोजी दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून रामेश्वरने मनिषा बिडवेची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे २२ मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावल्या तसेच महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहा सोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला. तो मृतदेहाशेजारीच झोपायचा तसेच जेवनही करायचा. मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला.त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेह दाखवला, त्यानंतर दोघांनी तिथले पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा तो प्लॅन फसला. या दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कळंबकडे आणण्यात येणार होता. आणि हत्येला वेगळ वळण देण्यात येणार होते, असा आरोप करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon