आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
दिशाच्या वडिलांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून पहिल्याच सुनावणीत विनंती मान्य; न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिशाचे वडील सतिश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या याचिकेतून सतिश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात राशिद खान पठाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेसोबत सतिश सालियन यांची फौजदारी रिट याचिका जोडण्याची विनंती हायकोर्टाकडे करण्यात आली आहे. त्यासाठी, दिशाचे वडील सतिश सालियन कोर्टात जातीनं हजर राहिल्याचं दिसून आलं. त्यातच, पहिल्याच दिवशी उच्च न्यायालयात सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची विनंती उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे. आमच्याकडून सुनावणीची पूर्ण तयारी झाली आहे, मात्र गुरुवारी सुनावणीत काही होण्याची शक्यता कमी आहे. कारण, ज्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे, त्यांच्याविरोधातच आमची तक्रार आहे, असे सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी सुनावणीच्याअगोदर पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते. न्यायमूर्तीं रेवती मोहिते-डेरे यांची सख्खी बहीण वंदना चव्हाण सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत. त्यामुळे, विविध कारणांमुळे गुरुवारी हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे, असे निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले होते. त्यानुसार, याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करत आता न्यायालयाने ही याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी बुधवारी याचिकाकर्त्यांची विनंती न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडून मान्य करण्यात आली असून आता लवकरच या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे उद्या तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हायकोर्ट रजिस्ट्रारला यासंदर्भात कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जारी करण्यात आल्याची माहिती देखील ओझा यांनी दिली. दिशा सालियन प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरू आहेत. दिशाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू अपघाताने डोक्याला मार लागूनच झाल्याचे म्हटलं आहे. दिशाच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन दिशा थकली होती. कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने तिने मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. मात्र, हे सर्व तत्कालीन सरकारच्या दबावातून फेरफार करुन बनवण्यात आल्याचे सतिश सालियन यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.