मोराची शिकार करणाऱ्या युवकाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली अटक
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – कल्याण तालुक्यातील कल्याण-मुरबाड रस्त्यावरील रुंदे गाव हद्दीतील आदिवासी वाडीतील एका इसमाला कल्याण, खडवली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटक केली आहे. या इसमाने मोराची शिकार केल्याचे वन अधिकाऱ्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यांना कल्याण जिल्हा न्यायालयात रविवारी सुट्टीकालीन न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावली. गणेश श्रावण फसाळे (३५) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो वीटभट्टी मजूर आहे. कल्याण वनपरिक्षेत्रातील फळेगाव वन विभागात मोराची शिकार होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ठाणे उपवनसंरक्षक, साहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी, खडवली वन परिमंडळाचे अधिकारी शनिवारी रात्री साडे अकरा वाजता कल्याण मुरबाड रस्त्यावरील रूंदे गाव हद्दीत पोहचले.मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी वीटभट्टीवर काम करणाऱ्या गणेश फसाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. गणेश यांनी आपण जंगलात मोराची शिकार केल्याची कबुली वनाधिकाऱ्यांना दिली. हत्या केलेल्या मोराचे अवयव एका चुलीवर एका पातेल्यात शिजवले असल्याचे गणेशने वनाधिकाऱ्यांना सांगितले.
मोराची हत्या केल्याने रूंदे गाव हद्दीतील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वनाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्रीच गणेश फसाळे यांना ताब्यात घेऊन कल्याण वन परिक्षेत्र कार्यालयात आणले. गणेश यांनी संरक्षित, राष्ट्रीय पक्ष्याची शिकार केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियमाने त्यांच्यावर वनाधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. रूंदे गाव हद्दीतील जंगलात गणेशने मोराची शिकार केली होती. त्याने मोराची हत्या करून शिजवलेले मटण खाण्यासाठी तयार केले होते. हे पुराव्यानिशी सिध्द झाल्याने वनाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी गणेश फसाळे यांना कल्याण जिल्हा न्यायालयात न्यादंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावली.