बोपदेव घाटात तरूणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या मुसक्या आवळल्या; एकाला पुण्यातून तर दोघांना नागपुरात अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यातील बोपदेव घाटात रात्री फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणी आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला. यावेळी ती तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्या तरुणाचा शर्ट काढून त्याचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर तीन आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेलल्या त्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. गेल्या काही दिवसांपासून या घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या तिघांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या तब्बल २५ टीमकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. याप्रकरणी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक डेटाच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरु होता. पण मोबाईल फोनला रेंज नसल्याने आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली होती. यानंतर बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.