माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबादवरून पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अमरावती येथील घरी प्राप्त झालं आहे. नवनीत राणा यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे आता खळबळ उडाली आहे. तसेच या पत्रामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. नवनीन राणा यांचे स्वीय साहायक विनोद गुहे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. शुक्रवारी दुपारी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतील निवासस्थानी एक निनावी पत्र आलं आहे. हे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव अमीर असल्याचे सांगितलं आहे. हैदराबादमधून त्याने हे पत्र पाठवलं असून त्याचे नातेवाईक दुबई आणि पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख त्याने या पत्रात केला” असल्याचे विनोद गुहे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना, “तुम्ही हिंदूंबाबत बोलता. हे योग्य नाही. मी तुमच्यावर सामूहिक अत्याचार करेन तसेच मला १० कोटी रुपये द्या अन्यथा मी तुमच्या घरासमोर गाय कापेन, अशी धमकीही त्याने दिल्याचेही विनोद गुहे यांनी सांगितलं आहे. या पत्रासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून याप्रकरणी तत्काळ कारवाई करून पत्र पाठवण्याऱ्या व्यक्तीला अटक करावी”, अशी मागणीही विनोद गुहे यांनी केली आहे. दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांना पाठवलेले धमकीचे पत्र हे इंग्रजी लिपीत असून त्याचा मजकूर मात्र हिंदीमध्ये आहे. तसेच या पत्राच्या दोन्ही बाजूंनी हे पत्र लिहिण्यात आले आहे. हे पत्र ज्या पाकिटामधून पाठवण्यात आले, त्या पाकिटावर नवी दिल्ली येथील पत्त्यासह रवी राणा यांच्या शंकर नगर येथील घराचा पत्ता खाली बारीक अक्षरात इंग्रजीमध्ये लिहिला आहे.