मेट्रो मार्गिकेच्या खांबाला एसटी बसची धडक; चालक आणि वाहकासह आठ प्रवासी जखमी

Spread the love

मेट्रो मार्गिकेच्या खांबाला एसटी बसची धडक; चालक आणि वाहकासह आठ प्रवासी जखमी

योगेश पांडे/वार्ताहर 

ठाणे – घोडबंदर येथील ओवळा भागात मंगळवारी पहाटे राज्य परिवहन सेवेची एसटी बस मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या अपघातात चालक आणि वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाची बसगाडी घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळील कठड्याला धडकली होती. त्यानंतर हा दुसरा अपघात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेजोगाई येथून बोरीवलीच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतुक करत होती. त्यामध्ये वाहक आणि चालकासह एकूण १३ प्रवासी प्रवास करत होते. ही बसगाडी पहाटे ५.३० घोडबंदर येथील ओवळा नाका परिसरात आली असता, बसगाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या धडकेमध्ये बसगाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तर बसगाडीमधील १३ पैकी आठ प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना उपचारासाठी ब्रम्हांड आणि मानपाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. के. अडसूळ – चालक – ३५, चाटे – वाहक, उद्धव चौरे – ६५, उर्मिला चौरे – ५५, सलीम शेख – ५८, आत्मराम शेजुळ – ४९, राजश्री शेजुळ – ४२ आणि आकांक्षा शेजुळ – ३५ अशी जखमींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon