विद्यार्थ्यांसाठी ठाणे पोलिसांचे जनजागृती मार्गदर्शन सत्र; महिला सुरक्षा व सायबर गुन्ह्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्त मा. श्री. आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून आयटीआय कॉलेज, वागळे इस्टेट येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व कायदेशीर विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महिला सुरक्षा, गुड टच–बॅड टच, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
यावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वापरावयाच्या हेल्पलाईन क्रमांक 112 तसेच सायबर फसवणुकीच्या तक्रारींसाठी 1930 या हेल्पलाईनबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शन सत्रांमुळे कायद्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे सांगत ठाणे पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. ठाणे पोलिसांकडून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.