भीषण अपघात ! नमाजला जाताना २१ जणांनी भरलेला पिकअप टेम्पो उलटला; एकाचा मृत्यू तर २० जण जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. नमाज अदा करण्यासाठी जात असताना २१ जणांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाल्यामुळे एक जण जागीच मृत्यूमुखी पडला, तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात अलिबाग तालुक्यातील बोरघर पुलाजवळ घडला असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल कंपनीमध्ये काम करणारे काही कामगार नमाज अदा करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील रामराज येथे जात होते. यावेळी त्यांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं रस्त्यावर पलटी झाला. या वाहनात एकूण २१ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं. जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.