दुचाकीवर दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांची तस्करी; वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाई
योगेश पांडे/वार्ताहर
वर्धा – दारूबंदी जिल्हा अशी वर्ध्याची ओळख असली तरी दारू विक्रीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात असते. कधी देवघराच्या ड्रॉवरमध्ये दारू लपवली जाते तर कधी जॅकेटमधून ती लपवून विकली जाते. अशा अनेक घटना या पूर्वी पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. पण आता चक्क दुचाकीवर दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांची तस्करीची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दुचाकीवरून येणारा दूध विक्रेता की दारू विक्रेता असा सवाल उपस्थित झाला आहे. वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची देवळी परिसरात अवैध धंदे बंद करण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होती. तेव्हा मिळालेल्या माहितीवरून वर्धा ते कळंब मार्गावर सापळा रचला गेला. नजर ठेवून असताना पोलिसाना दुचाकी गाडीवर प्रशांत कोंबे हा व्यक्ती दुधाचे कॅन घेऊन दिसला. दुचाकीवरून दोन्ही बाजूला दूध संकलन करण्यास उपयोगात येणारे कॅन अटकवून तो चालल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास जे आलं ते चकीत करणारं होतं. कॅनमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. दारू तस्करी करणाऱ्या आरोपीसह बार मालकवरही गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त केला आहे.