आयुक्तांच्या दालनात अर्धनग्न अवस्थेत बेमुदत उपोषण करणाऱ्या शिवसेनेचे कल्याणमधील माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात येऊन फडके चौक प्रभागातील पाणी प्रश्नावरून आयुक्तांच्या दालनासमोर अर्धनग्न अवस्थेत उपोषण करणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर पालिका सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून फडके चौक परिसरातील प्रभागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. हा भाग मोहन उगले यांच्या प्रभागात येतो. पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करुनही ते त्याची दखल घेत नव्हते. शुक्रवारी माजी नगरसेवक मोहन उगले पालिका मुख्यालयात आले. त्यांनी आयुक्तांच्या दालनात प्रवेश करून अर्धनग्न अवस्थेत बेमुदत उपोषण सुरू केले.
जोपर्यंत आपल्या प्रभागातील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण या जागेवरून हलणार नाही अशी भुमिका उगले यांनी घेतली. आयुक्त दालनाबाहेरील सुरक्षा अधिकारी सरिता चरेगावकर यांनी उगले यांना तेथून जाण्यास सांगितले. तेथून जाण्यास त्यांनी नकार दिला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा प्रकार कैद झाला. या पुराव्याच्या आधारे पालिका अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहन उगले यांच्या विरुध्द तक्रार केली.