‘ऑपरेशन मुस्कान-१४’ मोहिमेत रेल्वे पोलिसांना यश; ३०५ बालकांचा शोध, १९३ बालके पालकांच्या ताब्यात

Spread the love

‘ऑपरेशन मुस्कान-१४’ मोहिमेत रेल्वे पोलिसांना यश; ३०५ बालकांचा शोध, १९३ बालके पालकांच्या ताब्यात

रवि निषाद / मुंबई

मुंबई : हरवलेली व विनापालक रेल्वे स्थानकांवर आढळणारी बालके शोधून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ मोहिमेत मुंबई रेल्वे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेदरम्यान एकूण ३०५ बालकांचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी १९३ बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर ११२ बालकांना सुरक्षितपणे बालगृहात ठेवण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

महाराष्ट्रात मागील महिनाभर अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेल्वे स्थानकांवर विनापालक आढळणाऱ्या बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत होती.

या मोहिमेदरम्यान ताब्यात घेतलेल्या ३०५ बालकांपैकी १९३ बालकांना रेल्वे पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले. उर्वरित ११२ बालकांना विविध बालगृहांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी ५४ बालकांना बालगृहाच्या माध्यमातून त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले असून सध्या ५८ बालके बालगृहात आहेत.

दरम्यान, या मोहिमेत इतर जिल्ह्यांतील नोंद असलेली १४ बालके तसेच इतर राज्यांतील चार बालके असा एकूण १८ बालकांचाही शोध घेण्यात आला. सन २०१२ पासून हरविलेल्या बालकांबाबत नोंद असलेल्या १७ गुन्ह्यांपैकी ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ मोहिमेत दादर, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांतील तीन गुन्ह्यांमधील तीन बालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon