बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांची ससेहोलपट

Spread the love

बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांची ससेहोलपट

योगेश पांडे / वार्ताहर 

बदलापूर – बदलापूर मधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली. या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही.

अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच एफआयआर नोंदवून घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.दरम्यान हा आरोपी नक्की कोण आहे मात्र समजलेले नाही. एकीकडे देशात कोलकत्तासारखे प्रकरण गाजत असताना राज्यातील या घटनेमुळे पुन्हा एकदा बालवयातील मुली ते तरुणी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon