नशा करू नकोस नाहीतर घरच्यांना सांगेन, या रागातून मित्राने केली मित्राची हत्या, मुंब्रा पोलिसांकडून आरोपीच्या आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – नशा करू नकोस असे सांगणाऱ्या मित्राचाच राग आल्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा येथे उघड झाला आहे. त्यामुळे नशेच्या मोहापायी तरुण मुले खून करण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या मेहताब याचा मृतदेह ९ जून रोजी मुंब्रा आंबेडकर डोंगरावर सापडला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रेहान बाग येथे राहणाऱ्या मेहताब मंसुरी- १५ हा ६ जूनपासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई-वडिलांनी या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ९ जून रोजी मुंब्रा बायपास रोडवर असणाऱ्या आंबेडकर डोंगरावर मेहताब याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.
पोलिसांनी यासंदर्भात तपास केला असता मेहताब मन्सुरी याची मुंब्रा देवी येथे राहणाऱ्या २३ वर्षांच्या फैज सुलतान मलिक याच्याशी ओळख असल्याचे समोर आले. त्या दिशेने तपास करत असताना मेहताब हा खेळायला जात असताना बाजारपेठेत फैज याला भेटल्याचे समोर आलं होतं. त्या दिवशी फैज सुलतान हा आंबेडकर डोंगरावर नशा करण्यासाठी जात होता. याचवेळी मेहताब मंसूरी त्याला भेटला यावेळी मेहताबने देखील आपल्याबरोबर नशा करण्यासाठी यावे अशी फैजची इच्छा होती. यासाठी त्याने मेहताबच्या मागे तगादा लावला. त्यानंतर मेहताब याला इच्छा नसतानाही तो फैज बरोबर जबरदस्तीने जावं लागलं.
यावेळी फैजने त्या ठिकाणी नशा करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी मेहताब याने नशा करू नको असे फैज याला वारंवार सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याच रागात मेहताब याने फैजला नशा करत असल्याचे घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली. यावेळी मात्र फैजला राग आला आणि याच रागामध्ये फैजने मेहताब याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याचा खून केला. यासंदर्भात पोलिसांच्या हाती मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार फैज सुलतान याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास मुंब्रा पोलिस करत आहे.