शेअर बाजार व भिशीच्या आमिषाने चार कोटींची फसवणूक; महिलेसह चौघांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी : शेअर बाजारात तसेच भिशीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाणे येथे एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२३ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत मुळशी तालुक्यातील माण परिसरात हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांना शेअर मार्केट आणि भिशी योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. दरमहा ४ ते ५ टक्के अधिक परतावा मिळेल, असे सांगून त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेतली.
यामध्ये फिर्यादीकडून ५७ लाख ६ हजार रुपये, तर इतर गुंतवणूकदारांकडून ३ कोटी ५९ लाख १४ हजार ८९२ रुपये अशी एकूण ४ कोटी १६ लाख २० हजार ८९२ रुपयांची रक्कम आरोपींनी घेतली. मात्र गुंतवणूकदारांना कोणताही परतावा न देता तसेच मूळ रक्कमही परत न करता त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.