ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर : शहरातील बोल्हेगाव उपनगरात रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा मोठ्या आवाजात वापर करून जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवरदेवासह ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाणे येथे पोलिस नाईक रवींद्र तुकाराम धुंगासे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, शनिवारी रात्री बोल्हेगाव उपनगरातील आंबेडकर चौकात विवाह समारंभानिमित्त नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला होता.
गस्त घालत असलेल्या तोफखाना पोलीस ठाणे पथकाने वरातीतील प्रमुख व्यक्तींसह ध्वनिक्षेपक चालकाला आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र नवरदेव आणि चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी ध्वनीतीव्रता मोजमाप यंत्राद्वारे तपासणी केली असता आवाजाची पातळी ८२.४ डेसिबल इतकी आढळून आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी शहर व उपनगरातील ३७ प्रमुख मंगल कार्यालयांचे चालक आणि ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या मालकांना नियमांचे पालन करण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.
शहरातील विवाह मिरवणुका आणि ध्वनिक्षेपकांचा वाढता वापर वाहतुकीस अडथळा ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. सध्या शहरातील अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याने मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यातच परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच चौकात ध्वनिक्षेपक लावून वाढदिवस साजरे करताना तलवारीने केक कापण्याच्या वाढत्या प्रकारांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.