ठाण्यातील ज्वेलर्समधून कोट्यवधींची चोरी, सेल्स बॉयला माऊंट अबूच्या जंगलात ठोकल्या बेड्या
एक कोटी २६ लाखांचे दागिने देखील जप्त, नौपाडा पोलिसांची कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मालकाच्या दुकानात दागिन्यांची चोरी करून फरार झालेल्या एका सेल्स बॉयच्या ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आणि त्याला गजाआड केले. आरोपीने पकडले जाऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली होती खरे परंतु पोलिसांनी त्याला राजस्थानमधील माउंट अबू येथून अटक केली. ठाण्यातील नामवंत विरासत ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे मालक यशवंत पूनमिया यांनी आपल्या दुकानात तब्बल एक कोटी दहा हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नौपाडा पोलिसात केली. दुकानातील सेल्स बॉय म्हणून काम करणाऱ्या २९ वर्षे विशालसिंग राजपूत याने ११ मे रोजी दुकानातील तब्बल १८०७.६०० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. पोलिसांना आपला कोणताही पत्ता मिळू नये यासाठी आरोपी मोठ्या हुशारीने कार्यालयातील आधार कार्ड आणि इतर कागदपत्र घेऊन पळाला होता. पोलिसांनी जवळपास १०० सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर आरोपी तब्बल आठ ते दहा रिक्षा बदलून वसई येथे पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये फेकून दिला होता. पोलिसाचा माघ काढत गुजरात आणि राजस्थानपर्यंत पोहोचली व त्यांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांना आपला थांब पत्ता लागू नये यासाठी आरोपी कोणत्याच लॉजमध्ये न राहता राजस्थानातील माउंट अबू येथील जंगलामध्ये वास्तव्य करून होता. दिवसा तो घनदाट जंगलात लपून राहत असे व झोप पूर्ण करण्यासाठी रात्री कोणत्याही बसने प्रवास करत असे. अखेर दोन जून रोजी पोलिसांना आरोपी माउंट अबूच्या जंगलात लपून बसल्याचे कळताच तपास अधिकारी भांगे आणि त्यांच्या टीमने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक कोटी २६ लाखांचे दागिने देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. अशाप्रकारे पोलिसांना गुंगारा देऊन एवढी मोठी रक्कम घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केले.