सलमान खान गोळीबार प्रकरणात पिस्तुल पुरवणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलीवुड अभिनेते सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने बुधवारी आत्महत्या केली. आरोपी अनुज थापन याने मुंबई पोलिसांच्या कोठडीत गळफास लावून घेतला. त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर – ३७ व अनुज थापन – ३२ यांना दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्यातील थापनने बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर जीटी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला.थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला होता . बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. त्या पिस्तुल देण्यासाठी चंदर व थापन दोघेही १५ मार्चला पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. पिस्तुल गुप्ता व पाल यांना देण्यापूर्वी चंदर व थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचा संशय होता.