प्रियकराच्या छळाला कंटाळलेल्या आईने मुलाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा; दारुच्या बाटलीनं उकललं खुनाचं गूढ
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपल्या मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल २० दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंजा धोंडीबा नरहरे (२५) याचे उषा नानासाहेब चव्हाण (४०) हिच्याशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंजा उषाला बेदम मारहाण करत होता आणि मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाण हिने पुण्यात कामानिमित्त आलेल्या आपल्या मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण (२१) याच्याकडे आपली व्यथा मांडली. ती स्वतः चाकण येथे मुलाकडे आली.
प्रियकराकडून होणाऱ्या मारहाणीची माहिती दिल्यानंतर उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी मुंजा नरहरेची हत्या करण्याचा कट रचला. या कटात निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेण्यात आले.७ जानेवारी रोजी उषा चव्हाण हिने मुंजा नरहरे याला चाकणमध्ये भेटण्यासाठी बोलावले. गंगाखेड येथून मुंजा चाकणला आल्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी दुचाकीवरून त्याला सोबत घेतले. त्यानंतर खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी करून बिरदवाडी येथील ओढ्याजवळील निर्मनुष्य ठिकाणी दारू पार्टी करण्यात आली.
दारू पित असतानाच निखिल आणि स्वप्नील यांनी मुंजा नरहरेवर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला.७ जानेवारी रोजी ही घटना घडल्यानंतर ११ जानेवारी रोजी त्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती उत्तर चाकण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला; मात्र आरोपींनी मृताची ओळखपत्रे आणि मोबाईल काढून घेतल्याने सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती लागत नव्हता.
तरीही पोलिसांनी हार न मानता सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील कंपन्यांमधील कामगारांकडे कसून चौकशी सुरू ठेवली. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना घटनास्थळी आढळलेल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे पोलिसांनी खराबवाडी येथील मद्यविक्री दुकानांमध्ये चौकशी केली.७ जानेवारी रोजी पहाटे सहाच्या सुमारास तिघेजण दारूच्या बाटल्या खरेदीसाठी आल्याचे स्पष्ट होताच तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. पुढील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी निखिलच्या मित्राची असल्याचेही निष्पन्न झाले.
या संपूर्ण हत्येचा कट उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी रचल्याचे स्पष्ट झाले असून, उत्तर चाकण पोलिसांनी उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.