गर्दूल्यांकडून पोलिस कॉन्स्टेबलला विषारी इंजेक्शन, ठाण्यात उपचारा दरम्यान कॉन्स्टेबलचा मृत्यू

Spread the love

गर्दूल्यांकडून पोलिस कॉन्स्टेबलला विषारी इंजेक्शन, ठाण्यात उपचारा दरम्यान कॉन्स्टेबलचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केला होता. या पोलीस कॉन्स्टेबलला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी समोर आली आहे. विशाल पवार असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार नेहमीप्रमाणे रविवारी रात्री कामावर जात असताना ते लोकलमधून प्रवास करत होते. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ते लोकलच्या दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलत होते. त्यावेळी एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर फटका मारला आणि त्यांचा मोबाईल घेऊन पळाला होता.

मोबाईल चोराला पकडण्यासाठी विशाल पवार यांनी ट्रेनमधून उडी मारली. त्यांनी मोबाईल चोराचा पाठलाग सुरू केला. मात्र, पुढे दबा धरून बसलेल्या चोरांनी आणि नशेखोरांनी विशाल पवार यांना घेरलं आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या नशेखोरांनी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांना पकडून त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन दिलं, तर त्यांच्या तोंडातून लाल रंगाचं द्रव्य ओतलं होतं. यामुळे विशाल पवार बेशुद्ध पडले. त्यांना तब्बल १२ तासांनी शुद्ध आली. परंतु, घरी गेल्यावर मात्र विशाल पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने ठाण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान विशाल पवार यांचा मृत्यू झाला.

परंतु, मृत्यूपूर्वी कोपरी पोलिसांनी विशाल पवार यांचा जबाब घेतला होता व दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आलं आहे. दादर जीआरपी कलम ३०२ (हत्या) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon