धक्कादायक ! नवी मुंबईत रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या तरुणाला चौघांनी दिले खाली ढकलून
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई – सीबीडी ते नेरूळदरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या एका ३२ वर्षीय प्रवाशाला चौघा तरुणांनी बेदम मारहाण करून धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जखमी प्रवासी एका हाताने अधू झाला असून पनवेल रेल्वे पोलिसांनी चौघांविरोधात मारहाणीसह जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुमार लालजी दिवाकर (वय, ३२) असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला चार मुले आहेत. दिवाकर हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आठवडाभरापूर्वीच तो शहरात आला आणि उलवे येथील एका लॉन्ड्रीमध्ये त्याने नोकरी मिळवली होती. त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर २६ एप्रिल रोजी सुट्टीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेरुळहून उरणकडे जाणाऱ्या गर्दीच्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
नेरुळ स्थानकातील प्लॅटफॉर्मवरून गाडी निघत असताना दिवाकर गर्दीच्या डब्यात शिरला. मात्र, यामुळे चार प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी दिवाकरला मारहाण केली. दिवाकरने त्यांची माफी मागूनही त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांच्यातील एकाने दिवाकरवर चाकूने हल्ला केला आणि त्याला रेल्वेतून खाली ढकलले, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
दिवाकर रुळावर पडल्याने त्याच्या उजव्या हातावरून रेल्वे गेली. तसेच त्याचा पायही तुटला. तो रुळावर पडलेला पाहून रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याला वाशीतील एनएमएमसी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याला जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, दिवाकर यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्याला आपला उजवा हात गमवाला लागला आहे.
चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२३, ३२४, ३२६, ३४१, ५०४ व ५०६ अंतर्गत चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.