बीडमध्ये पैसा जीवावर उठला, मित्राने मित्राला संपवलं; पोलीसांकडून १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरात सोमवारी पहाटे घडलेल्या एका भीषण हत्याकांडाचा उलगडा करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यावसान खुनात झाले असून, पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला बीड शहरातून बेड्या ठोकल्या आहेत.
रायमोहा येथील रहिवासी आणि व्यवसायाने पेंटर असलेले चांद अल्हाहुद्दीन तांबोळी (गुड्डू) (३०) हे रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सकाळी बीडला जातो असे सांगून मोटारसायकलवरून घरून निघाले होते. मात्र, रात्र झाली तरी ते परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची शोधशोध केली, परंतु कोणताही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास रायमोहा गावातील डोंगर देवी शिवारात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह नागरिकांना आढळून आला. अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून अत्यंत निर्घृणपणे ही हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अतिक गुलाब तांबोळी (२९) याला संशयावरून ताब्यात घेतले.
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी अतिक तांबोळी याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत चांद तांबोळी आणि आरोपी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होता. याच वादातून सोमवारी पहाटे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि अतिकने रागाच्या भरात चांद यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे संताप व्यक्त होत असतानाच, पोलिसांनी केवळ १० ते १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावल्याने समाधान व्यक्त होत आहे.