वाघोली पोलीस चौकीसमोर तरुणाने स्वतःला जाळून घेतल्यानंतर बिल्डरसह इतरांवर गुन्हा दाखल.
पुणे – सोसायटीमधील पार्किंग, टेरेस व इतर सुविधा वापरण्यास नकार देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांसह १५ जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बकोरी फाटा, सिद्धी अपार्टमेंट येथे १० फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते रात्री १० वाजेपर्यंत घडला.
रोहिदास अशोक जाधव (वय ३३, रा. सिद्धी अपार्टमेंट, वाघोली) या तरुणाने वाघोली पोलिस चौकीसमोर स्वत:ला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याबाबत रोहिदासचा भाऊ नाना अशोक जाधव (वय २६, रा. वाघोली) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक सचिन जाधव (वय ३९, रा. गोकूळ पार्क, वाघोली), गजानन आबनावे, लता गजानन आबनावे, संग्राम गजानन आबनावे (रा. वाघोली) आणि डॉ. पाचारणे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंकित वाघोली चौकीत पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याच्या रागातून तरुणाने पोलीस चौकीसमोर स्वताला पेटवून घेतले होते.याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांची उचलबांगडी विशेष शाखेत करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे,मात्र स्वताला पेटवून घेणारा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.