नाशिकमधील बसस्थानकावर प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या महिलांच्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद
नाशिक – गर्दीचा फायदा घेत शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या प्रकरणी चार तरुणींना अटक करण्यात आली असून यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या संशयित तरुणी जालना, संभाजीनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. संजना रोहन शिंदे (१९),फरिना जय सोनवणे (१९) ,अशी संशयित तरुणींची नावे आहेत. त्यांच्यासह बाेईसर आणि पंचवटीतील १५ वर्षींय मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुनिता राजेंद्र पाटील (५०) या गेल्या गुुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महामार्ग बसस्थानकातून कसारा-नाशिक बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत संशयितांनी चोरुन नेले. या चारही संशयित मुलींना मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी चौकशी केली. यात दोन तरुणींनी गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. अल्पवयीन संशयित मुलींना नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दोघींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे