पुण्यात निखिल वागळे यांची चार वेळा गाडी फोडली ; वागळेंवर शाईफेक व जीवघेणा हल्ला
पुणे – पुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलिस बंदोबंदात जात असतानाही प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला. मात्र, कार्यक्रम पोहोचेपर्यंत पोलिस बंदोबस्त असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. इतकंच नव्हे, तर शाईफेक तसेच अंडीफेक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यावरून त्यांना पुणेच्या निर्भय बनो सभेसाठी इशाराही देण्यात आला होता. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. भाजप नेते सुनील देवधर यांनी वागळे यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती.
“सहा हल्ले झाले. सातव्या हल्ल्यातूनही वाचलो. आज हल्ला झाला तेव्हा मी काय बोललो, मरण डोळ्यासमोर होतं. ड्रायव्हर वैभवमुळे आम्ही वाचलो. प्रशांत दादा यांचा मी आभारी आहे. त्यांनी भाजपवाल्यांपासून वाचवलं. जोपर्यंत निखिल वागळे जिवंत आहे, तोपर्यंत फॅसिसमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. तुम्ही मला मारु शकतात. अनेकांना मारलं. तुम्ही कधीही आम्हाला मारु शकतात. आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे. माझ्या मनात एक विश्वास आहे. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला फुले, आंबेडकर किंवा महात्मा गांधी सारखं कुणीतरी वाचवतं. आपल्याला हे लोक मारु शकत नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. ही लढाई साधी नाही. ही फॅसिसम विरोधातील आहे”, असं निखिल वागळे म्हणाले
पोलिसांना कडक कारवाई करायला सांगणार’, अजित पवारांची प्रतिक्रिया
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटेनवर प्रतिक्रिया दिली आहे. “आताच हा प्रकार झाल्याचं मला समजलं, मी तिथल्या पोलीस आयुक्तांशी लगेच बोलणार आणि कडक कारवाई करायला सांगणार आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.