गरम तव्यावर बसून आशिर्वाद देणाऱ्या बाबाला अखेर अटक; भोपाळमधून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमरावती – कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत एका गावातील प्रशस्त जागेवर आश्रम थाटून दोन महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यापासून पसार गुरुदास बाबा याला स्थानिक गुन्हेशाखेने मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे पकडले. मार्च २०२३ दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मार्डी येथे गुरुदासबाबाच्या आश्रमात आली. तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला एकट्याला बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून तीचे मार्डी येथे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली. त्यानंतर भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने आपल्या आश्रमातच या महिलेवर तीन महीने सतत बलात्कार केला.
अश्लील चित्रफीत तयार करत वारंवार अत्याचार
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या बाबाने महिलेची अश्लील चित्रफीत सुद्धा केली असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. भोंदूबाबाने पिडितेला धमकी ही दिली की, या बाबत बाहेर कुणाला सांगितले तर जिवाशी मारू. आपल्या पतीची तब्बेत बरोबर राहत नाही, पतीचा आजार बरा व्हावा यासाठी सुनील कावलकर या भोंदू बाबाकडे ती पिडीत आली होती. मात्र या भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने २५ जानेवारीला कुऱ्हा पोलीस स्टेशन मध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनीही त्याच्याविषयी कसून तपास सुरु केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच हा भोंदूबाबा फरार झाला होता. काल रात्री भोपाळ येथील एका लॉज मध्ये त्याला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. सध्या भोंदूबाबाला अमरावतीत आणण्यात आलं. पोलिसांना आपली ओळख पटू नये यासाठी भोंदूबाबाने आपला पूर्ण लूक बदलवत आपली दाढी आणि कटींग केली होती. दरम्यान भोंदूबाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास सध्या पोलीस करीत आहे.