महाचोराने रचला दुचाकी चोरीचा इतिहास; पोलिस देखील गेले चक्रावून
७७ लाख ७० हजार रुपये किमतीची १११ चोरीचे वाहने जप्त, महाराष्ट्रातील एकूण ९ जिल्हात वाहनचोरी केल्याचं उघडकीस
प्रकाश संकपाळ
नागपूर – नागपूर पोलिसांनी अशा एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे, ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीच नाही तर अधिकारी सुद्धा चक्रावून गेले आहेत. या चोरट्याचे वय अवघे २४ वर्ष असून त्याने दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. ललित गजेंद्र भोगे असं या महा-चोरट्याचे नाव असून त्याने अवघ्या दोन वर्षात ७७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १११ दुचाकी चोरण्याचा विश्व विक्रमचं केला आहे. आरोपीने नागपूर शहर ग्रामीण सह विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर टिचून या पठ्याने तब्बल १११ दुचाकी चोरल्या आणि त्यांची परस्पर विक्री सुद्धा केली आहे. मात्र, एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंगचं फुटलं.
पोलिसांनी जवळपास २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले…
ललित भोगे हा नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेल्या नऊ जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी करायचा. त्यानंतर चोरीचे वाहनं ग्रामीण भागामध्ये विकायचा. गेले काही महिने नागपूर शहरात सातत्याने वाहन चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलीस सातत्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत होते. जवळपास २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अनेक दिवस तपासल्यानंतर नागपुरातून बेपत्ता होणाऱ्या वाहनांच्या मागे एकच चोर असल्याची शंका पोलिसांना आली. पोलिसांनी गोपनीय पद्धतीने या आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा ललित भोगे नावाचा हा चोर सध्या नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
प्रेमविवाह केल्यानंतर निवडला मार्ग
ललित भोगे याने कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन एका तरुणीशी प्रेमविवाह केला. तो कोंढाळीला राहायला लागला. संसार सुरु झाल्यानंतर घरात आर्थिक अडचणी येऊ लागल्या. पत्नीसुद्धा त्याला पैसे आणण्यासाठी तगादा लावू लागली. त्यामुळे ललितने चक्क दुचाकी चोरीचा धंदा सुरु केला. सुरुवातीला त्याला यश आल्यानंतर त्याने जवळपास ३ हजारां पेक्षा जास्त दुचाकी चोरल्याचा संशय आहे