कुख्यात अपेदारा आफ्रिदी अखेर जेरबंद
मुंबई पोलिसांवर केला होता हल्ला
दिनेश जाधव : कल्याण
देशभरात चेन स्नाचींग, जबरी चोरी, वाहनांच्या चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात इराण्याला कल्याण जवळच्या आंबिवलीतील इराणी वस्तीतुन सापळा लावून खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अपेदारा आफ्रिदि असे या चोरट्याचे नाव असून आफ्रिदी याने काही दिवसांपूर्वी चोरट्याला अटक करण्यास गेलेल्या मुंबई पोलिसांवर दगडफेक केली होती. अटक करण्यात आलेला आफ्रिदी हा १० गुन्ह्यांमध्ये फरार होता.
ठाणे जिल्हासह राज्य व देशभरात चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अपेदारा आफ्रिदी याला पोलिस जंग जंग पछाडत होते. मात्र अनेक वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे पथक कल्याणजवळ आंबिवली येथील इराणी वस्तीत एका चोरट्याला अटक करून नेत असताना अपे आफ्रिदि याने विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली होती. पोलीस आफ्रिदीचा शोध घेत होते. आफ्रिदी कल्याण जवळील आंबिवली मंगलनगर येथे राहत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड व त्यांच्या पथकाने मंगल नगर परिसरात सापळा रचला. आफ्रिदी येताना दिसताच त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. याच आफ्रिदीच्या विरोधात देशभरात ३० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.