सुट्ट्या नोटांच्या आमिषातून ५ लाखांची लूट; कल्याण पोलिसांची जलद कारवाई, ८ आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : सुट्ट्या नोटा देण्याच्या आमिषातून ५ लाख रुपयांची फसवणूक करून लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत कोळसेवाडी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत लुटीतील रोख रक्कम, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि नऊ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
वाघोली (पुणे) येथील दीपक शिंदे यांना ५ लाख रुपयांच्या बदल्यात सुट्ट्या १०, ५० व १०० रुपयांच्या नोटांमध्ये ७ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानुसार त्यांना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन येथे बोलावण्यात आले. तेथे स्कॉर्पिओमधून आलेल्या तीन-चार जणांनी पोलिस असल्याचे भासवून त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पलायन केले.
या प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. जुन्या पुणे महामार्गावरून जात असलेली स्कॉर्पिओ सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर अडवून चार आरोपींना पाच तासांत ताब्यात घेण्यात आले.
उर्वरित आरोपी आळंदी मार्गे अहिल्यानगरकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाणे यांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. अहिल्यानगर–शिर्डी रस्त्यावर आणखी चार आरोपींना पुढील ३६ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले.
तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून लुटीतील २ लाख ३६ हजार रुपये, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि नऊ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुख, निरीक्षक गणेश न्हायदे तसेच कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.