मुबंईत पोलिसांनी होळी आणि धुलिवंदन या दोन दिवसांत १६ हजार चालकांवर कारवाई; २ कोटींचा दंड वसूल, २०० ठिकाणी नाकाबंदी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – होळी आणि धुळवड या दोन दिवसात मुंबई पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल १६७२७ चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या १५९ मद्यपी चालकांची या विशेष मोहिमेत धरपकड करण्यात आली. यासाठी पोलिसांनी संपूर्ण मुंबईत सुमारे दोनशे ठिकाणी नाकाबंदी लावली होती. मुंबईमध्ये होळी आणि धुळवड मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. सणाच्या उत्साहाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी संपूर्ण मुंबईत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या दोन दिवसांत वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. त्यानुसार सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
या मोहिमेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे वेगवेगळ्या नियम मोडणाऱ्या १६७२७ वाहनांवर ई चलान जारी करण्यात आले. या चलानच्या माध्यमातून पोलिसांनी सुमारे २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये सर्वाधिक ४२ लाख ९७ हजारांचा दंड विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर ठोठावण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या वतीने ब्रेथ ऍनालायझरचा वापर करण्यात आला होता. दारू पिऊन वाहन चालविणारे १५९ चालक या चाचणीमध्ये अडकले गेले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांचे लायसन्स पुढील कारवाईसाठी आरटीओकडे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या कारवाईतून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चांगला धडा मिळाला आहे. वाहन चालक आणि इतरांच्या सुरक्षेसाठीच अशाप्रकारची कारवाई केली जाते. पोलिसांकडून वारंवार याबाबत आवाहन केलं जातं. पण तरीही अनेक जणांकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसतं.