मसाल्याच्या दुकानातील १४ लाखांची चोरी उघड; नोकराला ४८ तासांत अटक, १०.४७ लाख जप्त
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : मसाल्याच्या दुकानातून सुमारे १४ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या नोकराला अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात मुंबई पोलीस यांना यश आले. काळाचौकी पोलीस स्टेशन पथकाने ही कारवाई करत आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री ते सकाळदरम्यान फिर्यादी यांनी त्यांच्या ‘खामकर मसाला’ या दुकानातील आठ दिवसांची जमा झालेली १३ लाख ८६ हजार २०० रुपयांची रोख रक्कम गल्ल्यात ठेवली होती. मात्र दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर ही रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १३९/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
तपासादरम्यान दुकानातील कामगारांची चौकशी केली असता एक कर्मचारी संशयास्पदरीत्या अनुपस्थित असल्याचे समोर आले. पुढील माहिती घेतली असता तो उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत अयोध्या येथे त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपी अजय कुमार श्याम सुंदर रावत (२८) याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन पंचांच्या उपस्थितीत केलेल्या झडतीत त्याच्याकडून १० लाख ४७ हजार ५२० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकी पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांची तत्परता पुन्हा अधोरेखित झाली आहे.