अपहरण व जबरी लूट प्रकरणाचा ६ तासांत उलगडा; सहा आरोपी जेरबंद, २९.६९ लाखांचा ऐवज जप्त
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : अपहरण करून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा अवघ्या सहा तासांत पर्दाफाश करत मुंबई पोलीस अंतर्गत अँटॉप हील पोलीस स्टेशन पथकाने सहा आरोपींना अटक केली. मुंबई व गोवा येथून ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून २९.६९ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रवण लक्ष्मण रावल (४५, विरार पश्चिम, पालघर) हे अॅन्टॉपहिल परिसरात पायी जात असताना चार अज्ञात इसमांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. आरोपींनी त्यांना धमकावत त्यांच्या ताब्यातील सुमारे ३२.५० लाख रुपये रोख रक्कम लुटली. त्यानंतर रावल यांना घाटकोपर परिसरात सोडून आरोपी फरार झाले.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक २२६/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ३०९(२), ३(५) अन्वये दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. प्रारंभी तपासात कोणताही ठोस धागेदोरा मिळत नसतानाही पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू ठेवला. संबंधित कंपनीतील मागील वर्षभरात नोकरी सोडलेल्या व्यक्तींची माहिती तपासण्यात आली असता एका संशयिताचा माग काढण्यात यश आले.
गुप्त माहितीच्या आधारे चेंबूर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी साखळी कारवाई करत एकूण सहा आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये राहुल एकनाथ गायकवाड (३०), इरफान अली अहमद अली खान (३३), विवेक विलास काकडे (३२), संतोष वसंत मलेकर (४४), स्वप्नील चंद्रकांत पाटील (३४) आणि मोहम्मद रिजवान अन्सार (४१) यांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपींना नालासोपारा, गोवा तसेच कुर्ला परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत आरोपींकडून २९,६९,००० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पुढील तपास सुरू आहे.