लग्न समारंभांत चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई; तीन आरोपी अटकेत
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : लग्न समारंभांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीवर मुंबई पोलीस यांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सी.आर. क्रमांक ३१५/१६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी लग्न समारंभात उपस्थित महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरताना स्पष्टपणे दिसून आले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत त्यांना अटक केली.
या घटनेमुळे लग्न समारंभांमध्ये होणाऱ्या चोरीच्या प्रकारांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. नागरिकांनी अशा कार्यक्रमांमध्ये मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.