पुणे पोलिसांची मोठी कारवाई!
राजस्थानातून शहरात आलेले तब्बल ३ कोटी ९२ लाख किमतीचे ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – राजस्थानातून टप्प्याटप्प्याने पुण्यात मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. खराडी पोलिसांसह गुन्हे शाखेने ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश करून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कोटी ९२ लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती ‘परिमंडळ सात’चे उपायुक्त सोमय मुंडे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्यांमध्ये मोतीसिंह राजपुरोहित (२८), हरीश रामदेवासी (२२), योगेश उर्फ मनीष बिश्नोई (३०), सचिन उर्फ एस. के. बिश्नोई (२०), अमित घुले (४०), रतनलाल जाठ (२०) आणि रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग (३४) यांचा समावेश आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुरवठादार, वितरक आणि किरकोळ एजंट यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असताना मोतीसिंह आणि हरीश यांना १२ लाख रुपयांच्या एमडी विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी हा ड्रग्ज राजस्थानातून आणत असल्याची कबुली दिली.
राजस्थानातून पुण्यात योगेश बिश्नोई एमडी विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला वाघोली परिसरातून १५१ ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली. सचिन बिश्नोईला मांजरी भागात पकडून त्याच्याकडून चार लाख ६५ हजार रुपयांचा एमडी जप्त केले. सचिनने मांजरीतील अमित घुले याला ७९ लाख रुपये किमतीचे ३९८ ग्रॅम एमडी विकले. अमित घुले यालाही अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या पथकाने राजस्थानात जाऊन छापेमारी करून मुख्य एमडी पुरवठादार रतनलाल जाठला अटक केली. पुण्यातील एमडी प्रकरणात फरारी असलेल्या रामकरण जाठ यालाही ताब्यात घेण्यात आले.
मोतीसिंह वाघोलीत गिफ्ट हाउस चालवत होता, तर हरीशने मोबाइल शॉपी सुरू केली होती. या व्यवसायाच्या आडून ते गेल्या वर्षभरापासून एमडीची विक्री करीत होते, अशी माहिती उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.पोलिसांनी एका कारवाईतून विक्री ते पुरवठा अशी संपूर्ण साखळी उघडकीस आणली.
-आतापर्यंत सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून १,९६० ग्रॅम एमडी (किंमत तीन कोटी ९२ लाख रुपये) जप्त करण्यात आला आहे.
-मोबाइल, महागडी कार आणि इतर साहित्य असा एकूण चार कोटी २७लाख रुपयांचा ऐवज जप्त.