नवी मुंबईत एसीबीचा सापळा; जीएसटी अधिकाऱ्यासह महिला सहाय्यक लाच घेताना रंगेहात अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नवी मुंबईत धडक कारवाई करत जीएसटी (व्यवसाय कर) विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या महिला सहाय्यकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. थकीत कर प्रकरणाची फाइल बंद करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप असून, ही कारवाई करण्यात आली.
कोपरखैरणे येथील २८ वर्षीय तरुण सॉफ्टवेअर व वेबसाइट डेव्हलपमेंटचा व्यवसाय करतो. त्याच्या व्यवसायासंदर्भात जीएसटी विभागाकडून PTEC आणि PTRC बाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या नोटीशीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी तक्रारदार बेलापूर येथील कार्यालयात गेला असता, व्यवसाय कर अधिकारी अमित भानुदास गिरी यांनी त्याला सहाय्यक वैशाली कदम यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
तपासादरम्यान, वैशाली कदम यांनी एकूण २३,९०० रुपयांची मागणी केली. यामध्ये १३,९०० रुपये अधिकृत शुल्क असून उर्वरित १०,००० रुपये फाइल बंद करण्यासाठी लाच म्हणून मागण्यात आल्याचे समोर आले. तक्रारदाराने २ एप्रिल रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर तडजोडीत लाचेची रक्कम ७,००० रुपये निश्चित करण्यात आली.
६ एप्रिल रोजी एसीबीने बेलापूर येथील कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी वैशाली कदम यांनी नोंदणीच्या नावाखाली अतिरिक्त २,००० रुपये स्वीकारले, तर अमित गिरी यांनी आपल्या केबिनमध्ये ७,००० रुपयांची लाच घेतली. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. सायंकाळी सुमारे ६.३५ वाजता ही कारवाई पार पडली.
कारवाईदरम्यान आरोपींच्या अंगझडतीत लाचेची रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, अमित गिरी यांच्या निवासस्थानी झडतीची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत कलम ७, ७(अ) आणि १२ नुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांनी या मोहिमेवर देखरेख ठेवली.