ठाण्यात ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाच कुटुंबातील तिघे जखमी
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली.
वागळे इस्टेटमधील शांतीनगर भागात असलेल्या ‘नूतन निलम’ या पाच मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गजेंद्र प्रसाद यांच्या घराच्या हॉलचा स्लॅब अचानक कोसळला. हा स्लॅब थेट चौथ्या मजल्यावरील यादव कुटुंबाच्या घरात पडला. त्या वेळी घरात उपस्थित असलेले तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले आणि जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने तातडीने कारवाई करत जखमींना बाहेर काढले व उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
संबंधित इमारत ३५ वर्षे जुनी असून एकूण २६ सदनिका आहेत. येथे सुमारे ९५ नागरिक वास्तव्यास होते. स्लॅब कोसळल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व रहिवाशांना महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. घटनेच्या कारणांचा तपास सुरू असून इमारतीच्या संरचनात्मक मजबुतीची पाहणी करण्यात येत आहे.