मुंबईत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई : १० तस्कर जेरबंद; १०.१४ कोटींचा मुद्देमाल जप्त
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने शहरात विविध ठिकाणी एकाच वेळी धडक कारवाया करत १० ड्रग्ज तस्करांना अटक केली. या कारवाईत सुमारे २९.२९२ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १०.१४ कोटी रुपये आहे.
या कारवाईत ९०२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), २०.७०० किलो गांजा आणि ७.६९० किलो हायड्रोपोनिक गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील वडाळा, विलेपार्ले, नागपाडा, गोरेगाव, धारावी, अंधेरी, माहिम, बांद्रा आणि मालवणी या परिसरांत ही मोहीम राबविण्यात आली.
वडाळा बीपीटी रोड परिसरातून २१८ ग्रॅम एमडी, वडाळा टीटी येथून २०.७०० किलो गांजा, विलेपार्ले पूर्व येथून ७.६९० किलो हायड्रोपोनिक गांजा, तर नागपाडा, गोरेगाव, धारावी, अंधेरी, माहिम, बांद्रा पूर्व आणि मालवणी येथून एकूण ४८४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध युनिट्सनी ही संयुक्त कारवाई केली. घाटकोपर, कांदिवली, आझाद मैदान, वरळी आणि बांद्रा युनिटच्या पथकांनी समन्वय साधत ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.
मुंबईला ड्रग्जमुक्त करण्याच्या दिशेने ही कारवाई महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.