पदोन्नतीसाठी पावणेतीन लाखांची लाच; पुणे जिल्हा परिषदेतील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पदोन्नतीच्या प्रस्तावाला अनुकूल अहवाल देण्यासाठी शिक्षण सेवकाकडून पावणेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून दोघांना रंगेहात अटक केली असून मुख्य आरोपीसह सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (५२), कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे (३२) आणि आतिश कैरू शिंदे (४०) यांचा समावेश आहे. तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रारदार शिक्षण सेवकाने उपशिक्षक पदासाठी पदोन्नतीचा प्रस्ताव पंचायत समिती, वेल्हे येथून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सादर केला होता. त्यानंतर खंदारे यांची भेट घेतली असता, जातवैधता प्रमाणपत्र नसतानाही प्रस्ताव अनुकूल पाठविण्याचे आश्वासन देत त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, आरोपींनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर उर्वरित रक्कम स्वीकारण्यासाठी तक्रारदाराला घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका मॉलसमोर बोलावण्यात आले.
सोमवारी एसीबीने सापळा लावून रंधवे आणि शिंदे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर मुख्य आरोपी खंदारे यालाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी सापळा यशस्वी केला असून सहायक आयुक्त नीता मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.