रुग्णालय की यमदूताचे घर? बदलापुरात सह्याद्री रुग्णालयावर गुन्हा दाखल; तरुणाचा संशयास्पद मृत्यू, तीन डॉक्टरांवर गंभीर आरोप
पोलीस महानगर नेटवर्क

बदलापूर – बदलापूरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रविण समजिस्कर या तरुणाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी बदलापूरमधील सह्याद्री रुग्णालयावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. योगेश मिंडे, डॉ. अनंत ठाणगे आणि डॉ. मनीष वाधवानी या तिघा डॉक्टरांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रविण समजिस्कर याला काही दिवसांपूर्वी सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारपद्धतीमुळेच तरुणाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठा गोंधळ घातला होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बदलापूर पोलिसांनी अखेर तिघा डॉक्टरांसह रुग्णालय प्रशासनावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरु असून वैद्यकीय अहवाल, उपचारांची केस पेपर्स, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, या घटनेने बदलापूरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “रुग्णालय की मृत्यूचे केंद्र?” असा संतापजनक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आरोप सिद्ध झाल्यास दोषी डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
या प्रकरणावर आता बदलापूरकरांची तीव्र नजर लागली असून पोलिस आणि आरोग्य विभाग पुढे काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे.