दुबईत भारताची शान उंचावणारे महाराष्ट्राचे वीर! Oceanman स्पर्धेत माजी सैनिक कृष्णा सोनमळेंची ऐतिहासिक कामगिरी
दुबई येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित Oceanman World Championship १० किमी ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेत माजी सैनिक व ठाणे पोलीस दलातील अधिकारी कृष्णा सोनमळे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत यशस्वीपणे आव्हान पूर्ण केले. ही केवळ वैयक्तिकच नव्हे, तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरले आहे.
कृष्णा सोनमळे हे महाराष्ट्र पोलीस दलातून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारे पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. दुबईच्या खडतर ओपन वॉटर ट्रॅकवर १० किलोमीटरचे आव्हान यशस्वीरित्या पार करत त्यांनी आपल्या जिद्दीचे, शारीरिक क्षमतेचे आणि मानसिक ताकदीचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले.
माजी सैनिक म्हणून देशसेवा आणि त्यानंतर पोलीस दलात जबाबदारी निभावत असतानाच खेळातील ही चमकदार कामगिरी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अभिमान वाढला आहे.
कृष्णा सोनमळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा पाऊस बरसत आहे.