उमर्टीत पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी बंदुकांचे तब्बल ५० कारखाने उद्ध्वस्त; ३६ संशयित ताब्यात

Spread the love

उमर्टीत पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
गावठी बंदुकांचे तब्बल ५० कारखाने उद्ध्वस्त; ३६ संशयित ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव : जळगाव सीमेलगत मध्य प्रदेशातील पार उमर्टी गावात सुरू असलेल्या अवैध गावठी बंदुकांच्या निर्मितीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत सज्जड धडक दिली आहे. शनिवारी रात्री करण्यात आलेल्या या गुप्त आणि नियोजनबद्ध छाप्यात तब्बल ५० गावठी बंदुकांचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले असून ३६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी २१ गावठी बंदुका आणि विविध शस्त्रसाहित्य जप्त केले आहे. ही संपूर्ण कारवाई जळगाव पोलिसांना कोणतीही कल्पना न देता करण्यात आली.

उमर्टी हे बडवानी जिल्ह्यातील एक लहान गाव. मात्र, येथे घराघरांतून गावठी बंदुकांची निर्मिती केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा यापूर्वी झाला होता. काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर या अवैध उद्योगाला अधिक बळ मिळाले होते. येथे तयार होणारी शस्त्रे महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये चोरट्या मार्गाने पोहोचत असून, अनेक गुन्ह्यांमध्ये या बंदुकांचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे.

अलिकडेच पुण्यातील कारवाईत गुन्हेगारांकडून जप्त झालेल्या बंदुकांवर ‘युएसए’ असा शिक्का आढळल्याने तपास अधिक गडद झाला. खोलात जाऊन तपास केल्यानंतर ‘युएसए’ म्हणजे ‘उमर्टी शिकलगर आर्म्स’ असा अर्थ समोर आला. शिकलगर समाजातील काही घटक या अवैध शस्त्रनिर्मितीत गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. एका बंदुकीची किंमत १५ ते २० हजारापर्यंत असून तयार माल प्रथम जळगावच्या चोपडा, अमळनेर, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तसेच मध्य प्रदेशातील सेंधवा येथे पोहोचवला जातो. तेथून देशभरात त्यांची तस्करी केली जाते.

यावर तोडगा काढण्यासाठी पुणे पोलिसांच्या १०५ जणांच्या विशेष पथकाने मध्य प्रदेशच्या पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने ही मोठी कारवाई केली. छाप्यापूर्वी ड्रोनद्वारे गावाची टेहळणी, मोबाइल जॅमर, वायरलेस कोऑर्डिनेशन यांसारखी अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली. गावाला वेढा घातल्याचे लक्षात येताच गुन्हेगारांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला; मात्र शीघ्र कृती दल व अश्रूधूर पथकाने त्वरित नियंत्रण मिळवले.

उमर्टीतील अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे पूर्णपणे मोडून काढण्यास राज्यातील व केंद्रातील पोलीस यंत्रणा वर्षानुवर्षे अपयशी ठरत असताना, पुणे पोलिसांच्या या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जळगाव, धुळे तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील गुन्हेगारीला लागलेला मिळणारा पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon