वसईतील दरोडा ४८ तासांत उघडकीस; मित्रानेच रचला होता कट, ३ आरोपी अटकेत, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
नालासोपारा : वसईतील दामुपाडा परिसरात घडलेल्या थरारक दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा अखेर ४८ तासांत तपास लावण्यात अपराध प्रकटीकरण शाखा – कक्ष २, वसई यांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे फिर्यादीच्या पतीचा मित्रच लालसेपोटी दरोड्याचा सूत्रधार निघाला आहे.
१८ नोव्हेंबर रोजी दुपारी गीता राऊत यांच्या घरी तिघे अज्ञात इसम जबरदस्तीने घुसले. त्यांनी गीता आणि त्यांच्या मुलाला गळ्यावर चाकू लावून सोन्याबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली. गीता यांनी प्रतिकार केल्यावर आरोपींपैकी एकाने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकला असला तरी त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी कपाटातील १२ तोळे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल फोन असा मुद्देमाल लंपास करून पलायन केले. याबाबत वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
फिर्यादींचे पती चित्रसेन राऊत यांचा मित्र काळू प्रभाकर साहू हा त्यांच्या घरी सतत येत असे. घरातील संपत्ती पाहून त्याची नियत फिरली आणि त्यानेच दरोड्याचा कट रचला. साहू याने अशोक उर्फ बाबू राजू शिंदे या गुन्हेगारास पाठीशी घेतले. तसेच कामगार नुर हसन खान आणि सुरज किशोर जाधव यांना पैशाचे आमिष दाखवून घराची रेकी करून घेतली.
दरोड्याच्या वेळी स्वतः कुठेही फिरले नाही, असे दाखवण्यासाठी साहू जवळपास गेला नाही. मात्र आरोपी पळाल्यानंतर तो लगेच गीता राऊत यांच्या घरी पोहोचून सांत्वन करण्याचे नाटक करत तक्रार देण्यासाठी त्यांच्यासोबत पोलिस ठाण्यातही गेला आणि तपासाची दिशा व पोलिसांची हालचाल काय आहे, याचा सतत मागोवा घेत राहिला.
तपास पथकाने कौशल्यपूर्ण छाननी करून केवळ ४८ तासांत तिघा आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून तब्बल १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वसई-विरार परिसरात घडलेल्या या गुन्ह्याने सर्वत्र खळबळ उडाली असून मित्रानेच विश्वासघात केल्याची घटना नागरिकांना चकित करणारी आहे.