भालगावमध्ये आदिवासी कुटुंबावर हल्ला; नऊ जणांविरोधात गुन्हा, सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी
पोलीस महानगर नेटवर्क
मुरूड-जंजिर : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी वाडीत घुसून वाघमारे कुटुंबावर मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिठागर येथील नऊ जणांनी भालगाव येथील वाघमारे कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश महादेव वाघमारे यांना हाताबुक्यांनी व लाथांनी मारहाण करण्यात आली. तसेच पत्नी संगिता वाघमारे, मुलगा साहिल वाघमारे आणि काका चंदर वाघमारे यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. जखमींना तातडीने मुरूड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
फिर्यादी मंगेश वाघमारे (४२) यांच्या तक्रारीवरून मिठागर येथील दिपेश कृष्णा ठाकुर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकुर, विराज विजय ठाकुर, करण विठोबा चिपकर, सुजय संतोष शहापुरकर, दिपेश दत्ताराम माळी, विनिते विजय ठाकुर आणि सागर पांडुरंग ठाकुर या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला सहा आरोपींना अटक करण्यात आली होती, तर उर्वरित तिघांनाही नंतर ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाची माहिती मिळताच रायगड उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आदिवासी कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.