मुंबईतल्या घाटकोपर परिसरातील एका बारमध्ये ४० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; पंतनगर पोलीसांनी आठ जणांना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतल्या घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका बारमध्ये ४० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बारमधील मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती, ही या मारहाणीत संबंधित व्यक्तीचा जीव गेला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. सर्व आरोपीना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष संजीव रेड्डी, शाहिद नबीजानमिया अन्सारी, पुट्टुस्वामी गावी गौडा, भगवान कुशल सिंग, सुशीलकुमार अर्जुनराम रवाणी, राजेशकुमार यादव, सोहेल उर्फ शेख अमीन हुसैन, आणि अमरनाना पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आठ आरोपींची नावं आहेत. तर हर्ष किरण लालन असं हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी लालन यांचा बारमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता. याच वादातून झालेल्या मारहाणील लालन यांचा जीव गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत हर्षचे वडील किरण लालन हे मुंबईतल्या अंधेरी भागात राहतात. त्यांचं घाटकोपर येथील हेटक्वार्टर नावाच्या बारमध्ये नेहमी येणं जाणं असतं. या बारचे मालक संतोष शेट्टी हे किरण लालन यांचे चांगले मित्र आहेत. घटनेच्या दिवशी नेहमी प्रमाणे किरण लालन आपला मुलगा हर्ष याच्यासोबत या बारमध्ये कामानिमित्त भेटण्यासाठी गेले होते. पण त्यावेळी बारमध्ये संतोष शेट्टी नव्हते. त्यामुळे दोघंही पिता-पुत्र काही काळ बारमध्ये संतोष शेट्टी यांचं वाट पाहत थांबले. पण बराच वेळ झाला, तरी संतोष शेट्टी बारमध्ये आले नाहीत. दरम्यान, हर्ष लालन हा सातताने बारच्या मॅनेजरकडे आणि बारमधील इतर कर्मचाऱ्यांकडे संतोष शेट्टी यांच्याबाबत विचारणा करत होता. यातून मॅनेजरसोबत हर्षचा वाद झाला. याच वादातून बारच्या मॅनेजरसह बारमध्ये काम करणाऱ्या इतर सात ते आठ कर्मचाऱ्यांनी हर्ष लालन यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भायनक होती, ही हर्ष यांचा यात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष लालन आणि त्यांचे वडील किरण लालन शनिवारी बारमध्ये कशासाठी गेले? बारच्या मालकाकडे त्यांचं नेमकं काय काम होतं? याचा तपास पोलीस करत आहेत. बारमध्ये अशाप्रकारे एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.