मुंब्रामध्ये देशी बनावटीच्या दोन पिस्तुलांसह तरुण अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंब्रा–पनवेल रोडवरील गोटेघर परिसरात अवैधरित्या अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणाला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखा घटक-१, ठाणे येथील पोलीस हवालदार धनंजय आहेर यांना ९ जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे पथकाने शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटेघर समोरील पनवेल–मुंब्रा रोडलगत साई गॅरेजजवळ सापळा रचला. त्यावेळी संशयित सद्दाम मिलन शेख (वय ३४, रा. सम्राटनगर, मुंब्रा) यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुले व चार जिवंत काडतुसे आढळून आली.
या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ करत आहेत.