धुळे पोलिसांची मोठी कारवाई; ज्वारीच्या शेतात लावलेला ७६ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
धुळे – धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरमलीपाडा शिवारात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड झाल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात, पोलिसांनी दोन शेतांवर छापे टाकून सुमारे ७६ लाख रुपयांचा गांजा जप्त केला. पोलिसांनी यावेळी दोघांना अटक केली. तर पोलीस पथक येताना पाहून एक व्यक्ती पळून गेला. यावेळी परिसरात चांगलीच धरपकड रंगली होती. शिरपूर तालुक्याच्या हद्दीतील दुर्गम भागात वनजमिनीवर गांजा लागवडीची अनेक प्रकरणं यापूर्वी उघडकीस आली आहेत. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिरपूरच्या सांगवी पोलिसांनी बोरमाळीपाडा गावाजवळील भोईटी शिवारात छापा टाकला. संतोष ज्ञानसिंग पावरा आणि रामप्रसाद हुर्जी पावरा हे ज्वारी पिकाच्या आडून वनजमिनीवर गांजा लागवड करत असल्याचं आढळून आलं. भावसिंग काशीराम पवार यांच्या रहिवाशापासून काही अंतरावर असलेल्या वनजमिनीची पाहणी केली असता, तिथे गांजाची लागवड आढळून आली.
दरम्यान, संशयित आरोपी भावसिंग काशीराम पावरा फरार झाला होता. पोलिसांनी या कारवाईत ७६ लाख रुपयांच्या गांजाची रोपं जप्त केली. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(अ), २०(ब) २(अ) आणि २२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे. पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.