ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक कारवाई; बेहिशोबी रोकड, अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

Spread the love

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक कारवाई; बेहिशोबी रोकड, अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी ठाणे पोलिसांनी कडक सुरक्षा उपाययोजना राबवत मोठी कारवाई केली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड, अमली पदार्थ, अवैध दारू तसेच घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

निवडणूक ड्युटीसाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकांद्वारे आणि स्थिर तपासणी पथकांमार्फत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या तपासणीत आतापर्यंत तब्बल २ कोटी १६ लाख ८९ हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे.

यासोबतच अमली पदार्थांविरोधातही व्यापक मोहीम राबवण्यात आली. गांजा, एमडी, कोकेन, हिरोईन आदी अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ७८ कोटी ३५ लाख रुपयांहून अधिक आहे. या कारवाईत ३,१४४ आरोपींवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १०.९२ लाख रुपये किमतीची १३,२१५ लिटर अवैध दारूही जप्त करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ आणि ‘कोम्बिंग ऑपरेशन’ अंतर्गत २७ बेकायदेशीर बंदुका, ३७ जिवंत काडतुसे आणि १४२ सुऱ्यांसह घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. याशिवाय शहरातील ३,७६० परवानाधारक शस्त्रांपैकी ३,०६९ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत.

निवडणुकीदरम्यान संवेदनशील भागांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार असून, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रूट मार्च काढले जात आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर दररोज लक्ष ठेवत प्रतिबंधात्मक कारवाईही सुरू आहे.

निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आश्वासन ठाणे पोलिसांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon