तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लेखाधिकारी निघाला लाचखोर; ६ लाखांची लाच घेतांना अटक
धाराशिव : छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाने धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला सुमारे ६ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना लाच घेतांना पकडण्यात आले आहेत ३ कोटी ८८ लाखांच्या कामापैकी थकलेले १ कोटी ८८ लाखांचे बिल मंजुरीसाठी शिंदे याने १० लाख रुपये मागितले होते. तडजोडीअंती ६ लाख रुपये घेतांना त्याला ताब्यात घेण्यात आले.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित सैनिक स्कूलच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजला, प्रवेशद्वार व संरक्षक भिंत बांधकामाचा सुमारे ३ काेटी ८८ लाखांचा ठेका तक्रारदारास मिळाला हाेता. हे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पूर्ण झालेल्या या बांधकामाचे आजवर २ काेटी रूपयांपेक्षा जास्तीची बिले तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले व उर्वरित बिल तपासणी करुन मंजुरीस पाठविण्यासाठी संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे यांनी ठेकेदाराकडे पंचासमक्ष सुमारे १० लाखांची मागणी केली हाेती. तडजाेडीअंती ६ लाख रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंध विभाग पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशीष पाटील यांचा समावेश होता.