ठाणे रेल्वे स्थानकावर भीषण अपघात; महिलाचा उजवा हात तुटून वेगळा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक येथे सोमवारी दुपारी १.२२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर आलेल्या महानगरी एक्सप्रेसमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने सीमा शब्बीर शेख (२८) या महिलेचा उजवा हात खांद्यापासून पूर्णपणे तुटून वेगळा झाला, तर उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली.
स्टेशन मास्टर यांनी अनाऊन्समेंटद्वारे घटनेची माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलिस व हमाल घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या S-५ आणि S-६ कोचखालून महिलेला बाहेर काढण्यात आले. अपघाताच्या वेळी महिला शुद्धीवर होती. स्टेशन मास्टर यांचा मेमो घेऊन दोन हमालांच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे अपघात विभागातील ड्युटीवर असलेले डॉ. दत्ता यांनी तातडीने उपचार सुरू केले.
जखमी महिलेच्या मोबाईलवरून तिच्या वडिलांना घटनेची माहिती देण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, हात पूर्णपणे वेगळा झाल्याने आणि येथे शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे हलविणे आवश्यक आहे. त्यानुसार आई-वडिलांनी स्वतःच्या जबाबदारीवर तिला सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले.
दरम्यान, जखमी महिलेचा मोबाईल तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आला असून उपचारादरम्यान ती शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेप्रकरणी ठाणे पोलिस पुढील तपास करीत आहेत.